तेलंगणात गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; सब-इंस्पेक्टरसह १३ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Foto
हैद्राबाद : गणपती विसर्जनादरम्यान तेलंगणामध्ये विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस सब-इन्स्पेक्टरचा देखील समावेश आहे. तेलंगणाचे पोलीस महासंचालक सी. व्ही. आनंद यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली आहे.

डीजीपी सी. व्ही. आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात गणेश विसर्जनाच्या वेळी वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण १३ लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर २६ जण जखमी झाले आहेत. मात्र या मृत्यू आणि दुर्घटनांच्या कारणांविषयी सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

डीजीपी यांनी यावर्षी राज्यात बसवण्यात आलेल्या गणपती मूर्तीची आकडेवारीही जाहीर केली. तेलंगणामध्ये अधिकृतपणे १.२४ लाख गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. तसेच घरातील, गृहनिर्माण संस्थांमधील आणि अपार्टमेंट्समधील मूर्तींचा विचार केल्यास, राज्यभरात हा आकडा ३.५ लाख ते ४ लाखांच्या घरात असण्याचा अंदाज आहे.

गणेशोत्सवानिमित्त राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. या काळात सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या दरम्यान घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत.

लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप; गिरगाव चौपाटीवर विसर्जन संपन्न
मुंबई : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! असा अखंड जयघोष, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि डोळ्यांत दाटलेले अश्रू अशा भावूक वातावरणात मुंबईची शान असलेल्या लालबागच्या राजाला अखेर निरोप देण्यात आला. सलग २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर शनिवारी सकाळी सातच्या सुमारास लाडका राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. तिथे अरबी समुद्रात खोलवर नेऊन राजाच्या मूर्तीचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.

नवसाला पावणारा अशी जगभर ख्याती असलेला लालबागचा राजा शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर पडला होता. मंडपातून बाहेर येताच लाखो भाविकांनी राजावर पुष्पवृष्टी करत त्याचे दिमाखात स्वागत केले. लालबाग, भारतमाता, करी रोड, भायखळा, नागपाडा, दोन टाकी, ऑपेरा हाऊस मार्गे ही विसर्जन मिरवणूक पुढे सरकत होती. संपूर्ण मार्गावर लाडक्या बाप्पाची एक झलक डोळ्यांत साठवण्यासाठी अथांग जनसागर उसळला होता.